थोर शिक्षण महर्षी,पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्मवीर नगरी अर्थात अण्णांचे जन्मगावी कुंभोज नगरीतील सामाजिक भान असणाऱ्या सुसंस्कृत व कृतिशील युवकांनी दिनांक 22 सप्टेंबर 2017 रोजी कर्मवीर फौंडेशन ची स्थापना केली. समाजामध्ये कर्मवीरांच्या विचारांची सामाजिक एकतेची बीजे रुजवणे व त्यासाठी तळागाळात आण्णांचे विचार व कार्य पोहोचविणे हा कर्मवीर फौंडेशन चा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, तरुण व महिला यांना केंद्रस्थानी मानून अनेक उपक्रमशील कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणीव-जागृती निर्माण करण्याचे काम फौंडेशनने हाती घेतले आहेत. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक वृद्धी करिता वक्तृत्व, निबंध, चित्रकला, कथा-कथन, एकपात्री प्रयोग इत्यादी उपक्रम राबवित आहोत. महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 8 मार्च महिला दिन व 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून अनेक शिबिरे राबवली जात आहेत. तसेच तरुणांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे या हेतूने पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा, रक्तदान शिबिरे इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. रुग्णांना फळे वाटप, अनाथाश्रम भेटी, ऊसतोड कामगारांसाठी फराळ वाटप, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर आण्णा यांच्या जयंती-पुण्यतिथीच्या प्रसंगी व्याख्याने चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रम आयोजित करून महामानवांचे खरे विचार व सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अण्णांची जयंती हा लोकोत्सव व्हावा यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत असून ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फौंडेशन सतत कार्यरत राहील.